Skip to main content

शनिवारवाडा: पुणे शहरातील ऐतिहासिक वैभव

 

शनिवारवाडा: पुणे शहरातील ऐतिहासिक वैभव

नमस्कार मित्रांनो! पुणे शहरातील एका प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणी आपले स्वागत आहे - शनिवारवाडा.

समोर दिसणारा हा भव्य पुतळा थोरले बाजीराव पेशवे यांचा आहे. त्यांचे पूर्ण नाव बाजीराव बाळाजी भट किंवा बाजीराव बल्लाळ असे आहे. विशेष म्हणजे, हा शनिवारवाडा याच बाजीराव बल्लाळ यांनी बांधला.

मस्तानी दरवाजा आणि प्रवेश

आत्ता आपण शनिवारवाड्याच्या उजव्या बाजूने आत प्रवेश करत आहोत. हा जो समोर दरवाजा दिसतो आहे, तो मस्तानी दरवाजा आहे. मस्तानी या वाड्यात राहत असताना तिच्यासाठी हा स्वतंत्र दरवाजा बनवला गेला होता. या दरवाजाच्या आतील बाजूला मस्तानीचा महाल होता.

भारतीय पुरातत्व विभागाने लावलेल्या माहिती फलकानुसार, शनिवारवाडा आतून पाहण्यासाठी २० रुपयांचे तिकीट फक्त ऑनलाइन वेबसाइटवरूनच काढावे लागते. इथे रोख रक्कम स्वीकारली जात नाही.

वाड्याच्या परिसरातील महत्त्वाची ठिकाणे

वाड्याच्या समोरील पटांगणात हे बटाट्या मारुती मंदिर आहे. वाड्याच्या पटांगणातील मारुतीला सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणाऱ्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसवण्यात आली. हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.

वाड्याच्या अगदी समोरील बाजूला, जो सुरुवातीला आपण पाहिला होता, तोच हा पहिल्या बाजीराव पेशव्यांचा पुतळा आहे. पुतळ्याच्या समोरील बाजूला पेशव्यांची वंशावळ कोरलेली आहे. पुणेरी पगडी तसेच पेशव्यांचा इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे. हे बाजीराव पेशव्यांचे हस्ताक्षर आहे. एका नकाशात दाखवले आहे की, १७६० मध्ये मराठ्यांचे राज्य कुठपर्यंत पसरलेले होते. पहिले बाजीराव, अर्थात बाजीराव बल्लाळ, यांचा जन्म १८ ऑगस्ट १७०० मध्ये झाला.

शनिवारवाड्याची स्थापना आणि इतिहास

शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणूनच या वाड्याला शनिवारवाडा असे नाव पडले. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे आणि बदल होत राहिले. बुरुजाच्या दरवाजाचे काम पूर्ण होण्यास १७६० हे वर्ष उजाडले, तोच हा दिल्ली दरवाजा.

शनिवारवाड्यामध्ये १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता. पुढे वाड्यात तुरुंग, पंगुगृह आणि पोलिसांची निवासस्थाने होती.

वाड्याची सद्यस्थिती आणि महत्त्वाच्या घटना

१८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली आणि आगीत बहुतेक सर्व इमारती जळून खाक झाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी अखेर वाड्याची दुरवस्था संपली. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३ पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली.

शनिवारवाड्यासंबंधी अनेक ऐतिहासिक घटना आणि दुर्घटना घडल्या आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत असत. राजकारणाचे फड येथे रंगत होते; पेशव्यांचा दरबार येथेच भरत होता. पेशव्यांच्या घरांतील मुला-मुलींची लग्ने याच वाड्यात होत असत. शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे. पुढे येथे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली.


दिल्ली दरवाजा आणि तटबंदीचे निरीक्षण

वाड्याचा दिल्ली दरवाजा आणि संपूर्ण तटबंदी भक्कम आहे. दिल्ली दरवाजाची वरची बाजू लाकडी असून ती सुस्थितीत आहे. आता आपण मुख्य प्रवेशद्वाराची आतील बाजू पाहत आहोत. इथून आपण नगारखान्याच्या वर जात आहोत. वरती जाताना डाव्या बाजूला एक दरवाजा आहे. हा आहे उजव्या बाजूचा बुरुज. हा आहे शनिवारवाड्याला सुस्थितीत असलेला नगारखाना. हे सर्व लाकडी काम सुरेख दिसत आहे. हा वाड्याचा समोरील भाग आपल्याला दिसत आहे.

आता वाड्याचा आतील सर्व भाग आपल्याला दिसत आहे. पावसाळा सुरू असल्यामुळे वाड्यातील सर्व परिसर हिरवागार दिसत आहे. पाऊस सुरू झाला आहे.


तटबंदीवरून फेरफटका आणि वाड्याचे पैलू

आपण तटबंदीवरून फेरफटका मारत आहोत. वरून जे काही दिसते ते मी तुम्हाला दाखवत आहे. इथून खाली जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. हा आहे वाड्याचा उजव्या बाजूचा बुरुज. हा गोल स्तंभ कशाचा आहे याबद्दल माहिती नाही; तुम्हाला माहित असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. सुरुवातीला जो मस्तानी दरवाजा दाखवला होता, त्याचीच ही आतील बाजू आहे. वाड्याच्या चारही बाजूंच्या तटबंदीवरून खाली उतरण्यासाठी अनेक पायऱ्यांचे मार्ग आहेत; त्यातील हा एक आहे.

हा आहे गणपती रंगमहालातील कारंजा. हा आहे उजव्या बाजूच्या तटबंदीमधील मधला बुरुज.

आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या पुढील बाजूला लालमहाल दिसत आहे. हीच ती जागा आहे, या ठिकाणी महाराज लहानपणी काही वर्ष राहिले होते. हा आहे वाड्याच्या पाठीमागील उजव्या बाजूचा बुरुज.

आत्ता आपण वाड्याच्या अगदी पाठीमागील बाजूला आलो आहोत. हा मागील बाजूचा मधला बुरुज आहे. समोर दुघई महाल दिसत आहे. हा आहे डाव्या बाजूचा अगदी मागील बुरुज. हा आहे नारायण दरवाजा. याच्या बाजूने वरती येण्यासाठी पायऱ्या आहेत. हा डाव्या बाजूच्या तटबंदीमधील पायऱ्यांचा मार्ग आहे. हा समोरील डाव्या बाजूचा बुरुज आहे. आपण पूर्ण वाड्याला तटबंदीवरून वेढा घालून दिल्ली दरवाजाकडे आलो आहोत. आत्ता आपण समोरील दरवाज्यातून खाली उतरलो आहोत.

शनिवारवाड्याच्या आवारातील वडाची झाडे खूप जुनी आहेत. वाड्यातील कित्येक घटनांची साक्षीदार ही झाडे आहेत.

काही वेळापूर्वी तटबंदीवरून पाहिलेला हा दुघई महाल आहे. हा दोन मजली महाल होता; त्यात नक्की कोण राहत होते याचे पुरावे उपलब्ध नाहीत. जमिनीपेक्षा हा वाडा काही खोलीवर आहे. त्याकाळी वाडे बांधण्यात खूपच जबरदस्त नियोजन होते.

हा वाड्यातील प्रचंड मोठा हौद आहे. त्याकाळी वाड्यात एक हजारपेक्षा जास्त लोक राहत होती; त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हा हौद बांधला होता. या हौदाशेजारी एक मोठी विहीर आहे. वाड्याच्या मागील तटबंदी रुंदीला खूप मोठी असून, त्यामध्ये फिरण्यासाठी जागा तसेच काही खोल्या आहेत. मगाशी पाहिलेल्या हौदाच्या शेजारी हा खूप मोठा दगड ठेवलेला आहे. याचे कारण समजले नाही. हौदाच्या शेजारी ही पहा मोठी विहीर. हिच्यावर अर्धे बांधकाम केलेले आहे. इथे रहाट आहे; त्याने या विहिरीतून पाणी बाहेर काढले जाते.

निवासस्थाने आणि कारंजे

हे निवासस्थान आहे थोरले माधवराव पेशवे यांचे. हे निवासस्थान आहे सदाशिवराव भाऊ यांचे. समोर हजारी कारंजा आहे. हे सवाई माधवराव यांच्या करमणुकीसाठी बनवले होते. या कारंज्याचे पाणी १०० वेगवेगळ्या प्रकारे खेळवले जात होते. हा वाड्याचा मध्यवर्ती चौक आहे. या चौकात मुख्य कारंजा आहे. याभोवती बरीच दालने आहेत, तसेच भोजनाची जागा आहे. हा आहे नानासाहेब पेशवे यांचा आरसे महाल. हे आहे खुशाबा हैबतसिंग यांचे निवासस्थान. हे मस्तानीचे खापरपंतू आणि अलिबहादूर यांचा मुलगा होता. ही खोल जागा नक्की कशाची आहे हे समजले नाही. ही आहे गणपती रंगमहालात श्रीमंत पेशव्यांची बैठक. हा समोर आहे आठ तोटीचा कारंजी हौद. हे समोर आहे अमृतराव पेशव्यांचे निवासस्थान. हे समोर आहे गोदूबाई यांचे निवासस्थान. या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांची गादी होती. त्यांच्या नंतर पेशवे या गादीचे सर्वाधिकारी होते आणि ते सर्व कामकाज चालवत होते. हा समोर आहे राजस्त्रियांचा महाल.


तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला शनिवारवाडा? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा!

आमचा मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंक नक्की पहा. हा लेख तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

दरेकर घराण्याचा इतिहास

🚩सरदार दरेकर घराण्याचा इतिहास 🚩 ऐतिहासिक कार्य:- कऱ्हे पठारावरील अनेक कर्तबगार घराण्याप्रमाणे दरेकर घराणे शिवकाळापासून सरदारकी करून कार्यरत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हशम मावळे पायदळाचे सरदारांच्या यातील दरेकरांचे चार सरदार होते. १)गणोजी दरेकर 2) येसाजी दरेकर (3) बाळाजीराव (बाजीराव) दरेकर (4) राणोजी दरेकर यांचे वारस सुभानजी, गोरखोजी, मानाजी ,गोरोजी यांना अनेक गावांचे मोकासे होते. *२ एप्रिल १६६३ रोजी मोरो त्रिंबक पेशवे व निळोपंत सोनदेव यांनी शिवाजी महाराजांना सिंहगडावरील फितव्याबाबत सावधतेचा इशारा दिला. या पत्रात सिंहगडाच्या सुरक्षेसाठी दरेकर सरदारांचा तानाजी, कोंढाजी, कमळोजी यांच्यासह स्पष्ट उल्लेख आहे.* *शके १६१४ (इ.स. १६९२) मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी रायगड हस्तगत मोहिमेसाठी दरेकर, जाऊळकर, मावळे व इतर पायदळांना थेट आज्ञा केली होती.* *या आदेशातून दरेकर हे स्वराज्याच्या लष्करी मोहिमेत सक्रिय व विश्‍वासू सरदार होते, हे स्पष्ट होते.* छत्रपती शाहू महाराजांनी सयाजी दरेकर यांना भोसरे, वडखळ, लोणी, महिमानगड, वर्धन गड तसेच खटाव खातगुन आणि सुभान जी दरेकर यांना आंबळे हे वतन दिले हो...

भारतातील आणि जगातील धरणे

******   भारतातील आणि जगातील धरणे    ******** जगातील   सर्वात   मोठी ५    धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  जगातील   सर्वात   मोठे   धरण   करिबा   (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)  भारतातील सर्वात मोठी ५ धरणे (संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी फोटोवर क्लिक करा)           इंदिरा   सागर   धरण                                  सरदार   सरोवर   धरण                                   रिहंद   धरण                              भाख्रा   नागल   धरण                                नागार्जुन सागर धरण   इडुक्की  ...

शनिवार वाडा

शनिवार वाडा शनिवार वाडा  (बोली मराठीत शनवारवाडा) ही  महाराष्ट्रातील   पुणे  शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे.  इ.स.च्या १८व्या शतकात  हा वाडा  मराठा साम्राज्याचे  पंतप्रधान, अर्थात  पेशवे  यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक  म्हणून घोषित केलेले आहे. [१] शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे त...